Monday, 26 June 2017

प्रफुल्लचंद्र रे (रसायनशास्त्रज्ञ)

डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय (मराठी लेखनभेद: प्रफुल्लचंद्र रे; बंगाली: প্রফুল্লচন্দ্র রায় ;) (ऑगस्ट २, इ.स. १८६१ - जून २६, इ.स. १९४४) हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापली.
प्रफुल्लचंद्र रायांनी इ.स. १८८२ साली कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून नैसर्गिक विज्ञान हा प्रधानविषय घेऊन बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी युनायटेड किंग्डम येथे प्रयाण करून एडिन्बरा विद्यापीठात प्रवेश घेतला. इ.स. १८८६ साली त्यांनी बी.एस्सी पदवी, तर इ.स. १८८७ साली डी.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरे केले. इ.स. १८८९ साली ते भारतात परतले व कोलकात्यात प्रेसिडेन्सी कॉलेजात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी इ.स. १९१६ सालापर्यंत शिकवले. त्यानंतर ते कलकत्ता युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात पलित अध्यासनावर रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकवू लागले.
इ.स. १८९३ साली त्यांनी स्वतःचे भांडवल ओतून बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स वर्क्स हा रसायननिर्मिती उद्योग स्थापला. भारतातील रसायन व औषधनिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ या कारखान्याने रोवली गेली, असे मानले जाते. इ.स. १९०२ साली या कारखान्याचे मर्यादित कंपनीत रूपांतर करण्यात आले

Sunday, 11 June 2017

१० वी चा निकाल या लिंकवर बघा

साने गुरुजींची पुण्यतिथी (११ जून १९५०)

साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
साने गुरुजी यांच्या हस्ताक्षरातील एक कविता
बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनी राहो।।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।।
—साने गुरुजीकृत काव्यपंक्ती

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळबंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेखनिबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित 'गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे 'दु:खी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा इतिहास' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्‍त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

Monday, 5 June 2017

आज‘ जागतिक पर्यावरण दिन’

                           आज‘ जागतिक पर्यावरण दिन’

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा  करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ  या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding or encircle. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. म्हणून इ. स. १९६० मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले.
मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे.
आज आपण पर्यावरणाचा अभ्यास तीन भागात करत आहोत : पर्यावरण विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण तंत्रज्ञान.
पर्यावरण विज्ञान
यामध्ये तत्त्व, सिद्धांत व जैविक-अजैविक घटकांमधील आंतरक्रियांचा अभ्यास आपण करत आहोत. पर्यावरण शिक्षणात परिसंस्था- रचना, कार्य, संरक्षण व संवर्धन, जैवविविधता, प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती-मानवी व नैसर्गिक, जैवलोकसंख्या, पर्यावरणाचा धारणक्षम निरंतर शाश्वत विकास आणि पर्यावरणीय संस्थांच्या भूमिका व कार्याचा ऊहापोह आपण या अभ्यासात करत आहोत. यामध्ये मृदावरण, जीवावरण, जलावरण व वातावरण या सर्व घटकांचाही समावेश आहे. पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखांमधून पर्यावरणातील विविध तत्त्व, संबोधक आणि सिद्धांतासोबतच विविध पर्यावरणातील घटकांचे विश्लेषण, तत्त्वज्ञानाचे उपयोजन आणि पर्यावरण संरक्षण व संधारणासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.
जॉर्ज पर्किन व मर्श यांनी त्यांच्या ‘मॅन अँड नेचर’ या पुस्तकात (१९०७) मानव व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे. त्यांचे हे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पहिले पुस्तक ठरते. १८९९ मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी ‘द आऊटलूक टॉक’ या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य ‘पर्यावरण शिक्षण सुधारणा’ असे होते. पर्यावरण शिक्षणातून जाणीव, जागृती करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे यासाठी १९६५ मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षणशास्त्रात समाविष्ट करण्यात आला, तर १९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. जून १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृतिसत्रात ठरविण्यात आली.
पर्यावरण शिक्षण
यात पर्यावरणाविषयी ज्ञान, आकलन, कौशल्य, जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपली सकारात्मक मनोभूमिका निर्माण करते. तसेच पर्यावरण शिक्षण ही एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आणि हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असेल; जेणेकरून पर्यावरणविषयक एकसंध आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे, जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची ऊर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे ही पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येये ठरविण्यात आली.
पर्यावरण शिक्षण सद्य स्वरूप
बिलिसी (Tbilisi) येथे भरलेल्या पर्यावरणविषयक परिषदेत पर्यावरण शिक्षणाची खालील तत्त्वे निश्चित करण्यात आली-
१)    पर्यावरणीय शिक्षणात सामाजिक तंत्रज्ञानाविषयक आणि नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार व्हावा.
२)    पर्यावरण शिक्षण ही एक जीवनभर चालणारी शिक्षणप्रणाली असावी, ज्यात शाळापूर्ण शिक्षण, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण यांचा समावेश असावा.
३)    अध्ययनकर्त्यांला पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी नियोजन व अंमलबजावणी करण्याची संधी द्यावी.
४)    पर्यावरण शिक्षणाचा उपागम (Approach) आंतर विद्याशास्त्रीय असावा. त्यातून विद्यार्थ्यांचा पर्यावरणविषयक एकसंध व संतुलित दृष्टिकोन निर्माण व्हावा.
५)    वास्तव जीवनाशी निगडित समस्या याच पर्यावरण शिक्षणाच्या केंद्रस्थानी असाव्यात.
६)    पर्यावरणविषयक सकारात्मक दृष्टिकोन व मूल्यनिर्मिती करणे ही या शिक्षणाची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे असावीत.
७)    प्रमुख पर्यावरणीय प्रश्नाची उकल स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सहकार्यातून करावी.
आज पर्यावरण शिक्षणातील जागरूकता, ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि सहभाग ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार (१८ डिसेंबर २००३) पर्यावरण शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखडय़ात प्रत्येक शालेय स्तरावर पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे व पाठय़क्रम ठरविण्यात आले आहेत.